नव्वदीपारचा प्रवास
सन १९५४–५५ च्या सुमारास शिक्षण घेतलेल्या आमच्या माजी विद्यार्थीनी श्रीमती नलिनी नारायण नवरे या त्याचे प्रेरणादायी उदाहरण आहेत. त्यांनी सेवासदनमध्ये इयत्ता चौथीत प्रवेश घेतला आणि १९५८ साली इयत्ता सातवीत ५२% गुणांसह उत्तीर्ण झाल्या. शिक्षणाबरोबरच त्यांनी शिवणकामाचे तीन कोर्स पूर्ण करून कौशल्य विकासाला तितकेच महत्व दिले.
आज वयाच्या नव्वदीतही त्यांची स्मरणशक्ती उल्लेखनीय आहे. शाळेतील पहिल्या दिवसापासून ते शिक्षण पूर्ण होईपर्यंतच्या आठवणी त्या अत्यंत स्पष्टपणे सांगतात. त्यांना त्यांच्या शिक्षकांची, मुख्याध्यापकांची आणि सहाध्यायी मैत्रिणींची नावे अचूक आठवतात. विशेष म्हणजे, शाळा व वसतिगृहाची रचना, वर्गखोल्यांची मांडणी या सर्व गोष्टी त्या जणू एखाद्या नकाशाप्रमाणे सांगतात.
त्या काळात सेवासदनमध्ये सुमारे २५ ते ३० विद्यार्थिनी शिक्षण घेत होत्या. वाचनाची त्यांना विशेष आवड होती. स्वतः वाचन करण्याबरोबरच त्यांनी इतरांनाही वाचनाची सवय लावली. आजही त्यांना पेशव्यांच्या इतिहासासह विविध विषयांची माहिती स्पष्टपणे आठवते.
भाऊबीज निधीची संकल्पना, त्या काळातील शाळेची रचना आणि शैक्षणिक पद्धती याबाबत त्यांनी दिलेली माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्या काळात शाळेची फी नव्हती; केवळ शिवणकामासाठी सहा रुपये फी आकारली जात असे, असे त्यांनी सांगितले.
समाजाभिमुख वृत्ती असलेल्या श्रीमती नवरे या आर्थिक व सामाजिक कार्यात सक्रिय होत्या. त्या विविध उपक्रमांमध्ये पुढाकार घेत असत.
त्यांच्या आयुष्यातील एक विशेष अनुभव म्हणजे भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबतचा फोटो, जो गांधी शताब्दी वर्षानिमित्त आदिवासी मुलींच्या कार्यक्रमात काढण्यात आला होता.
त्यांनी विविध ठिकाणी काम करताना समृद्ध अनुभव मिळवले असून वाई येथे त्यांनी सुमारे साडेतीन वर्षे नर्स म्हणून सेवा दिली. डायरी लिहिण्याची सवय असल्यामुळे त्यांच्या आठवणी पुढील पिढ्यांसाठी मौल्यवान ठरल्या आहेत.
सन १९५४–५५ मध्ये इंदुमती भडवडे, रानडे, पाठक, पाटील आदी शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केले, याचा त्यांनी कृतज्ञतेने उल्लेख केला आहे.
श्रीमती नवरे यांची कन्या श्रीमती सुमित्रा सुगवेकर ह्यादेखील सेवासदन प्रशालेतील माजी विद्यार्थिनी असून, सेवासदन च्या शिक्षणपरंपरेचा वारसा पुढे नेणाऱ्या त्या आणखी एक अभिमानास्पद कडी ठरतात.
श्रीमती नवरे यांचे जीवन हे सेवासदनच्या शिक्षणपरंपरेचे जिवंत उदाहरण असून, आजच्या पिढीसाठी ते प्रेरणादायी ठरते.
