मी भारती नवरे
मी भारती नवरे — सेवासदन हायस्कूल, पुणे येथील १९६५ ची बॅच. लग्नानंतर सुमित्रा सुगवेकर म्हणून आयुष्याची नवी ओळख मिळाली. आज वयाच्या ७६ व्या वर्षी मागे वळून पाहताना मन कृतज्ञतेने भरून येते.
शालेय जीवनातील अभ्यासाची ओढ, मैत्रिणींमधील निरोगी चढाओढ आणि शिक्षकांचे प्रेमळ मार्गदर्शन यामुळे मी अकरावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. संस्कृतच्या शारंगपाणी बाई आणि भूमितीचे मराठे सर यांचे शिकवणे आजही स्मरणात आहे. त्यांच्या सारख्या शिक्षकांमुळेच पुढे मला Fergusson College मधून बी.एस्सी. पूर्ण करता आले.
लग्नानंतर नोकरी करण्याची संधी मिळाली नाही; पण गृहिणीपद मी मनापासून स्वीकारले. नेरळसारख्या खेड्यात राहून माझ्या तिन्ही मुलांना उच्च शिक्षण देणे, त्यांच्यात जीवनमूल्ये रुजवणे — हेच माझे ध्येय बनले. आज ती तिन्ही मुलं उच्चशिक्षित आणि गुणी आहेत, याचा मला अभिमान आहे.
नेरळमध्ये महिला मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले. पाचवी ते दहावीपर्यंतचे क्लासेस सुरू करून अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गरजू विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत देत ‘विद्यादान’ हे व्रत जपले. कर्जत पंचायत समितीत भाजपातर्फे निवडून येण्याची संधीही मिळाली. ग्रामीण भागात राहूनही स्त्रीने समाजकार्यात राजकारणात सक्रिय राहावे, हा संदेश माझ्या आयुष्याने दिला.
परंतु हे सर्व शक्य झाले ते माझ्या आत्यामुळे आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे माझी आई — नलिनी नवरे — हिच्यामुळे.
आज आईचे वय ९५ वर्षे आहे. या वयातही ती ताठ, निरोगी, स्वावलंबी आणि सकारात्मक विचारांची आहे. तिचे आयुष्य म्हणजे जिद्दीचा आणि आत्मविश्वासाचा जिवंत धडा.
आई केवळ १९ वर्षांची असताना वडिलांचे निधन झाले. आम्ही दोघी आत्याकडे आलो. आईचे शिक्षण विशेष झाले नव्हते, तरी तिने शिवणकामाचा डिप्लोमा केला. आणि तेव्हाच तिला जाणवले — “शिक्षणाशिवाय पुढे जाता येणार नाही.” आत्याच्या पाठिंब्याने तिने ‘सेवासदन प्रौढ शिक्षण’ वर्गात थेट चौथीत प्रवेश घेतला. चौथी आणि सातवी दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यामागे तिची जिद्द आणि सेवासदनमधील शिक्षकांचे मार्गदर्शन होते.
शिवणक्लासमध्ये शिकवणे आणि स्वतःचा अभ्यास आणि अर्थात घरकाम सुद्धा ती समर्थपणे सांभाळत होती. जुन्या पुणेरी वाड्यातील कॉमन टॉयलेटसमोर नंबर लावल्यानंतर पायरीवर बसून केलेला तिचा अभ्यास आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे. पोळ्या करत करत केलेला अभ्यास — हे तिच्या चिकाटीचे प्रतीक आहे.
नंतर तिने बाहेरून एसएससी परीक्षा दिली; थोडक्यात अपयश आले. पण ती खचली नाही. मला आत्याच्या स्वाधीन करून पंचवार्षिक योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यात शिवण शिक्षिका म्हणून काम स्वीकारले. तीन-तीन महिन्यांनी बदली, पायी चालत गावे गाठणे — तरीही चेहऱ्यावर तक्रार नव्हती. पुढे डांग सेवा मंडळाच्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहात अधीक्षिका म्हणून काम केले. छोट्या खेड्यांत राहूनही तिने शिक्षणाचा आणि स्वावलंबनाचा दीप पेटता ठेवला.
शिवणकाम आणि भरतकाम तिची खासियत. तिने केलेली कलात्मक दुपटी ,टेबलक्लॉथ, चौघड्या आणि माझ्या मुलींसाठी शिवलेले फ्रॉक्स — तिच्या कलेचे साक्षीदार आहेत. वयाच्या ९० व्या वर्षापर्यंत ती स्वतःचे ब्लाउज स्वतः शिवत होती! स्वयंपाकातही तिचा हातखंडा — मोहरी फेसून केलेली लोणची आणि उपासाचे थालीपीठ म्हणजे तिची खास ओळख.
नीटनेटकेपणा, नऊवारी साडी, मनोभावे देवपूजा, आणि सर्वात महत्त्वाचे — सकारात्मक दृष्टिकोन. आनंदी राहणे ही तिची जीवनशैली आहे. आणि त्यामुळेच तिच्या नातवंडांची आणि पंतवंडांची सगळ्यांचीच लाडकी आहे. ते सगळेच तिची खूप काळजी घेतात.
मला वाटते, तिच्या या जडणघडणीत ‘सेवासदन प्रौढ शिक्षण वर्गा’चा मोठा वाटा आहे. आणि पर्यायाने रमाबाई रानडे यांच्या कार्याचा! त्यांच्या दूरदृष्टीमुळेच असंख्य स्त्रियांना शिक्षणाचा आणि स्वाभिमानाचा मार्ग खुला झाला. त्यांच्या स्मृतीला माझे शतशः अभिवादन.
काही वर्षांपूर्वी ‘उंच माझा झोका ‘ ही मालिका पाहताना रमाबाई रानडे आणि सेवासदन या दोहोंबद्दलच्याअभिमानाने ऊर भरून येत असे. आजही ‘सावित्रीबाई फुले ‘सिरीयल पाहताना पुन्हा त्या स्मृती जाग्या होतात. महिला सबलीकरणाच्या वाटेवर आज अनेक पावले पडत आहेत; पण त्या वाटेची दिशा दाखवणाऱ्या अशा स्त्रियांची आठवण मनाला नवी ऊर्जा देते.
आईकडून मला शिकायला मिळाले — परिस्थिती कितीही कठीण असो, शिक्षण आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर स्त्री स्वतःचे आणि पुढील पिढीचे भविष्य घडवू शकते.
आज तिच्याकडे पाहताना एकच भावना मनात येते —
जिद्द, श्रम आणि शिक्षण यांच्या आधारावर उभी राहिलेली स्त्री म्हणजेच देशाचे खरे सामर्थ्य!
