भाषा : ज्ञानाची किल्ली

मागील महिन्यात पुणे पुस्तक महोत्सवात एका स्टॉलवर एक जपानी विक्रेता अगदी तरुण मुलगा भेटला. विशेष म्हणजे तो हिंदी आणि मराठी भाषा बोलू शकत होता. या दोन्ही भाषेतून ग्राहकांशी उत्तम संवाद साधू शकत होता. एक वर्ष झाले तो भारतात राहतो आहे. मित्रांशी गप्पा मारता मारता या दोन्ही भाषा बोलायला शिकलो असे त्याने सांगितले. आणखी एक असेच बहुभाषिक कुटुंब यानिमित्ताने आठवले. वडील तेलुगु, आई मराठी भाषक, राहतात कर्नाटकात त्यामुळे मुले हिंदी, मराठी, कन्नड, तेलुगु आणि इंग्रजी अशा पाच भाषांमध्ये संवाद करू शकतात. नोकरीनिमित्त परराज्यात राहायला गेलेल्या अनेक कुटुंबांचा असा अनुभव आहे की, त्या राज्याची भाषा त्या कुटुंबातील लहान मुले सहज आत्मसात करतात. नवीन मित्रमैत्रिणींशी गप्पा मारताना, विशेषतः खेळताना सहजतेने आणि नकळत नवीन भाषेशी मैत्री करतात. वरील उदाहरणांमध्ये संवाद साधण्यासाठी पुरेसे भाषाज्ञान मिळवल्याचे दिसून येते. एखादी भाषा अजिबात समजत नाही, लिपी माहिती नाही त्यामुळे वाचताही येत नाही तरीही गूगल ट्रान्सलेट द्वारे संवाद साधण्याची कला अनेकांना ज्ञात आहे. माझ्या ओळखीचे एक कुटुंब जपानसारख्या देशात यामुळेच यशस्वी पर्यटन करू शकले. असे म्हणतात की, लहान वयातील मुलांची नवीन शिकण्याची क्षमता अनन्यसाधारण असते. जितके जास्त अनुभव आपण या मुलांना देऊ तितके ते पटकन आत्मसात करून शिकू शकतात. अधिक नवीन अनुभव म्हणजे मेंदूतील पेशींच्या जुळण्या अधिक. त्यामुळे मेंदूला सतत नवीन माहिती टिपून घेणे, ती माहिती योग्य त्याठिकाणी सुरक्षित ठेवणे आणि हव्या त्या वेळेला या माहितीचा उपयोग करवून घेणे याचीही सवय लागते. फक्त लहान वयातच शिकणे होते का? तर याचे उत्तर नाही असेच आहे. मनुष्य आयुष्यभर विद्यार्थी असतो असे आपल्याकडे म्हणतातच. वरील सर्व उदाहरणे भाषा शिक्षणाशी निगडित आहेत. एखाद्या भाषेत संवाद साधू शकण्याइतपत भाषेची माहिती होणे हे जसे महत्त्वपूर्ण आहे तसेच त्या भाषेतील वाक्प्रचार, म्हणी, एकाच शब्दाचे अनेक अर्थ, तसेच पारंपारिक कथा, कहाण्या याबाबत इत्थंभूत माहिती मिळाली तर आपण त्या भाषेतील साहित्याचा आस्वाद घेऊ शकतो. उदा. मराठी भाषेवी पुरेशी ओळख नसलेल्या व्यक्तीला विख्यात साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या शाब्दिक कोट्या समजणारच नाहीत आणि त्यांच्या साहित्याचा आनंद, आस्वाद ती व्यक्ती घेऊ शकणार नाही. संतांचे अभंग समजावून घेण्यासाठी येथील संस्कृती, धारणांची ओळख आधी व्हायला हवी. यासाठी भाषा वाचता, लिहिता, बोलता यायला हवी. थोडक्यात भाषेचे समग्र ज्ञान करून घ्यायला हवे. सुदैवाने भारतात अनेक राज्यभाषा आहेत. या भाषांबरोबरच परदेशी भाषा शिक्षणाबाबत विद्यार्थी तसेच पालक जागरूक होताना दिसत आहेत.

यासाठीच वर्तमान युगाची आवश्यकता जाणून घेऊन पुणे सेवासदन संस्थेने परदेशी भाषा शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. Sevasadan Institute of Foreign languages या ठिकाणी विविध परदेशी भाषा शिक्षण दिले जाते. आस हवी ती नवीन गोष्टी शिकण्याची. जितक्या आपण नवनवीन गोष्टी शिकू तितका आपला मेंदू तल्लख राहील. १९०९ या वर्षात परमपूजनीय रमाबाईसाहेब रानडे यांनी पुणे सेवासदन संस्थेची स्थापना करून केवळ मुलींसाठी आणि तेही सर्व स्तरातील मुलींसाठी शिक्षणाची कवाडे खुली केली. आता हीच संस्था भाषा शिक्षणाच्या माध्यमातून विश्वसंचाराचे स्वप्न मुलींच्या मनात जागवत आहे. या शिक्षणप्रवाहातील सर्व घटकांना मनापासून शुभेच्छा!

 
श्रीमती मनीषा पाठक , माजी शिक्षिका – कै सुंदरबाई राठी प्रशाला.
Scroll to Top